परत एकदा धोकेबाज मीच..!!!
दोन दिस झालं कळलं त्वा नवा लॅपटॉप घेतला म्हणून, पप्या इसरला लका मला. तरी तुला सांगत व्हतो. नग घेऊ नवा पण छा... तू म्हव कव्हा ऐकणार नाय. लका आठीव ते दिवस काय हालत व्हती तुही. काम्पूटर साठी कुणाकडं बी पाळायचास ह्याचा घी त्याचा घी मग काम पुर कर. एक प्रियसी प्रियकराला ईचाराती व्हय र तू मला कधी सोडून तर जाणार नाय ना? तव्हा त्यो प्रियकर तिला म्हणतु कधी म्हणजी कधी म्हणजी कधी च जाणार नाय. पण जे व्हायचं तेच व्हतं अन त्वा बी तेच केलंस. लका तुह्या हातात आलो तव्हा म्हयात खरच अजिबात जीव नव्हता. त्वा मला नवा जनम दिलंस. तव्हाच ठरीलं व्हतं आता ही साथ शेवटपथुर. पण लका अजून जीव हाय माह्यात अन तू मला सोडून दिलंस त्या प्रियसी सारखं. एक वचन दिलंत त्वा मला आज त्याचीच आठवण करून द्यायला आलो हाय. “त्वा जरी नवा कॉम्प्युटर घेतला तरी मला इसरणार नाय".
त्यो दिवस मला अजून बी आठवतो धूळ खात पडलेलो मी अचानक तुह्या हातात पडलो. पहिल्यांदा वाटलं उगाच आलो तुह्याकडं बरं व्हतं धूळ खात पडलेलं काही काम नाही कसले आकडेमोड नाय, कसले गणित नाय. ते ० अन १ च्या कोड नि डोकं पाक गरगरायला लागायचं. तुह्याकडं आलो जरा धूळ झटाकलीस अन कचकच पिना खुपशिल्यास मला तर त्याच दिशी तुहा राग आलेला. तव्हाच बोलणार व्हतो दादा जरा हळूच मव्हा पहिलाच जीव जायला लागला हाय. पण म्हणल जाऊद्या नवीन मालक हाय. म्या बी पाहिले चार पाच दिस महे चांगलेच रंग दाखिले मुद्दामुहून लवकर चालूच व्हतं नव्हतो. कधी कधी चालू झालो तर काही प्रोसेस च करायचो नाय. मी तरी काय करणार मला एका चांगल्या डाक्टर ची गरज व्हती. बरं झालं टायमावर घेऊन गेलास नायतर मी फिक्स स्वर्गवासी झालो असतो बघ. चांगला बक्कळ पैका खर्च केलंस की लका मह्यावर अन मला नवा जनम दिलंस. तव्हाच ठरविलं आता ह्योच आपला दोस्त. रूम वर आणून चांगलं नारळ फोडलास अन गुलाल बी लावलास. मला जरा बरं वाटलं त्या दिशी.
झालं बाबा तुव्ह काम सुरू अन मही शून्य-एक ची आकडेमोड सुरू. इंजिनीरिंग ची पोरं सगळे असलेच असतेत का र शेवटच्या दिशी रात अन दिस काम करणार, लका आमचा थोडा तरी इचार करत जा. आमचा एकाद्या दिशी स्फोट होऊन जायचा. त्या दोन स्पीकर च्या पिना खुपसून लई गाणे ऐकलेस लका. अजून एक त्यो राऊटर घेऊन आलास त्याची बी वायर घुपसलीस. आता इतक्या वायर झाल्या की कोणती कशाची ते तुला बी कळना. केसाचा व्हतो तसा वायरच पाक गुतडा करून टाकलास.
हे बघ पप्या म्या तुव्ह सगळं ऐकलं पण इंटरनेट जोडल्यावर त्वा १०८० पिक्सल चा व्हिडीओ लावसाल तव्हा मात्र मव्हा श्वास गुदमरून गेला व्हता. थोड्या येळात डायरेक्ट ढगात गेलो असतो. तू व्हतास म्हणून नायतर आपुन अजिबात ऑन पण नसतो झालो. मला माहित व्हतं तू मह्यावर लई प्रेम करतोस फक्त त्यामुळं मी तुह्या ऑटोकॅड च बी वजन घेतलं. पहिल्यांदा पहिल्यांदा त्याचे आकडेमोड करायला लका जडच गेलं पण दोस्तीसाठी काय पण.
दोन चार बऱ्या गटांगळ्या खाल्ल्या म्या तुव्ह काम करतानी पण धीर नाय सोडला. आता तू जरी मला इसराला असशील तरी लक्षात ठेव तुहे लई मोठे फोटो माह्याकडं हाईत कधी ना कधी येशीलच माह्याकडं, तव्हा मी बी तुला चांगलाच तंगावणार बघ. मला माहित हाय तुह्या नव्या लॅपटॉप मधी लई काय काय हाय. त्यो ४के व्हिडीओ बी चालतोय जणू त्यात, त्यो लागल्यापासून तर तू मला कटच मारूनच जातोस.
आता म्या तुला ब्लॅकमेल करतोय असंच म्हण वाटलं तर, तू जर आता लवकरच नाय लक्ष दिलं तर तुहे सगळे फोटो, फाईल माह्या आधी ढगात गेल्या म्हणून समज.
पप्या तुव्ह मला काही माहीत नाय पण म्या तुह्यावर मनापासून प्रेम केलेलं हाय. आपली दोस्ती शेवटपथूर टिकणार हाय. मला परत त्या धुळीत जायचं नाय, मला त्या इ-वेस्ट मधी बी जायचं नाय मला माहित हाय तू आता मला जास्त येळ देऊ शकत नाय तू एक काम कर ना... मला तुह्यासारख्याच एखाद्या दोस्तकडं सोडून ये ना. पण मी तुला कधीच इसरणार नाय.मला फॉरमॅट जरी केलं तरी तुह्या नावच एक फोल्डर मह्या हृदयात एका कोपऱ्यात जीव हाय तवर नक्की राहणार ते तू तपासायला कधीही ये. आता असं वाटाया लागलंय आपली या जन्मीची सोबत इथवरच हाय. पुढल्या जन्मी मात्र मी चांगला अपग्रेड होणार म्हणजी तुला काय त्रासच नाय होणार. मला माहित हाय मी पण तुह्या हृदयात कुठेतरी नक्की हाय फक्त आवाज दे हा तुव्हा दोस्त तुह्यासाठी कव्हाबी धावत पळत येणार.
(टीप:- वरील गोष्ट सत्य घटनांवर
आधारित आहे.)


Comments
Post a Comment