जीबडी

लका जाल्या लई वाईट दिस आणलेस मह्यावर त्वा, मॅट्रिकीच्या परीक्षेला किती पोरं बसविले व्हते र पाक कंबारड मोडलं बग म्हव. जरा तरी लाज हाय का नाय, पैक कमवायच्या नादात माह्याकडं तुव्ह अजिबात ध्यान नाय बघ. तेइस पोर बसिलेस लगा अन वरून डिझ्याल टाकायचं तर घसल्याट टाकून पळवीतोस, मायच्यान संगतीय जीव जायचा बाकी व्हता. टपाडावर चार पोर बसवलं अन थोबाडापुढ तीन, तुला तरी दिसत व्हत का रं पुढलं. एक जण तर सांगत व्हता पुढं ढोरं आलीत म्हणून तव्हा कुठं वाचले मी. बरं आता एवढं व्हावून बी मी तुही साथ सोडली नाय म्हणलं हाय याचा सिझन तर जाऊद्या, जाल्या त्या दिशी तुव्हा हात गियर पतूर पुरत नव्हता लगा तुव्ह मुंडक बाहेर अन एका टिरिवर मला चालवीत व्हता, बरं झालं बाजूच्या पोरांनी पटकीनी गियर बदलीला नसता खरंच जीवच सोडीत व्हते बघ म्या. 
त्ये मॅट्रिकीचे पेप्पर झाले, तर लगेच बारावीचे सुरू अन ते झालं की झाला तुव्हा लग्नाचा सिझन सुरू. आर त्या बारावीच्या पेपराला जातानी कसलं गाणं वाजवत निघालास लका ते पोर पेपराला चाललेले अन तुव्ह गाणं, “पर देसी पर देसी जाना नही" आर लका पोर नापास व्हायची येळ आली अन काय जाना नाही लका ते पुढल्या खेपेला फिक्स येत्यात बघ. त्या गण्याचं लफडं माह्यापासून सुरू झालं अन त्यो तर पार इसरला लका मला. मागच्या शिटावर त्याची ती राणी बसत व्हती अन त्यो मधल्या शीटावर बसायचा तर लका तो मुंडक मोडूस्तोर मव्हा आरास गरागरा फिरवीत व्हता अन तिला चोरून बघत होता. असे किती पोरायचे लफडे माह्यामुळं सुरू झाले अन आज मला कुणीच ईचारिना हे बघ जाल्या तुला आता हे मी शेवटचं सांगतेय मला अपग्रेड व्हायचं हाई.

ते आता घसलेट टाकायाच सोडून दे, त्या घसलेटामूळ आता मला फकिस्त कर्करोग व्ह्यायचा बाकी हाई बघ. आता पिवर डिझेल मिळतंय अस ऐकलं हाई तेच टाकलं तर म्या पळणार. महे टायर बदलीव लका पाक ट्यूब बाहिर यायची बाकी हाय. अन अजून एक सांगतेय, ते एअर बॅग का काय असतंय अस बी ऐकलं हाई, बघ जमल तर. लोक जरा कमी बसिवत जा अन ती तुही एक टीर बाहेर काढून बसलास तर तुव्ह काय खरं नाही बघ. गाणे जरा नवीन वाजवीत जा आजकालचे पोर पाक बदाललेत. जमलंच तर एक साऊंड सिस्टीम टाकून घी. म्हणजी मव्ह बी तेवढच मन लागलं. 
जाल्या एक सांगायचं राहूनच गेलं मला कुणाला इकु नगस, म्या तुह्यावर लई प्रेम केलं हाय. मला माहिती हाय नव्या गाड्यात लई भारी भारी फॅसिलिटी आल्या हाईत वाटलं तर काही नग मला अपग्रेड करू मी हाय तशीच बरी हाय. पण एक सांगतेय, तुही ती एक टिर अन मुंडक तेवढं आत घेऊन बसत जा. 
तुहीच प्रिय, जीबडी...❣️

Comments

Popular posts from this blog

परत एकदा धोकेबाज मीच..!!!

धोकेबाज मी...!!!