ते वरीस धावी च व्हतं अप्पा चा संत्या अन तात्याचा किश्या लहानपणापासन एकमेकांचे दोस्त व्हते. जय विरु ची ही जोड व्हती. शाळा सुरू व्हवून दोन अडीच महिन झाले व्हते. पोरांचा अभ्यास बी चांगला चालू व्हता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या नुसत्या उनाडक्या करण्यात गेल्या व्हत्या. शाळेत पाहिलं धा-पंधरा दिस जरा अवघडच गेलं.संत्याच मन शाळत लागत नव्हतं. तुकडीत पोरांच्या तुलनेत पोरी कमीच म्हंजी अर्ध्याला अर्ध्याच असत्यान. संत्या अन किश्या सेमी इंग्रजी ला व्हते, ते सेमी म्हणजी काय इचरल तर अजून बी सांगता येत नव्हतं पण ते सेमी ला व्हते. दिसं जरा बरे चालले व्हते. पण शाळा सुरू व्हवून पंधरा सोळा दिस झाले तरी इंग्रजी शिकाया कोण येत नव्हतं. तसं बी पोरांना इंग्रजी चा तास म्हणलं की कटाळा यायचा. त्यो तास व्हतं नव्हता म्हणून खेळाचा तास घेत व्हते, पोरांना तेवढंच बरं वाटायचं. पण एक दिशी नवा मास्तर इंग्रजी ला येणार हाय अन त्यो मास्तर जिल्ह्याच्या ठिकाणावरून येणार हाय अस पोरांना कळलं. आता जरा पोरांची फजितीच निघणार व्हती. ती तारीख संत्या कधी बी इसरणार नाय. १ जुलै व्हता त्यो, सकाळच्या प्रार्थने च्या टायमाला सगळे पोरं पटांगणात आले व्हते. इंग्रजी चा नवा मास्तर पण दिसत व्हता पण लका ती पोरगी कोण हाय मास्तर सोबत संत्या किश्याला ईचाराती व्हता. कुणाला काय बी माहीत नव्हतं. प्रार्थना संपल्यावर पोरं वर्गात जायला निघाले. धावी च्या पोरीची लाईन लवकरच वर्गात जायला निघाली, संत्या च ध्यान तिकडं गेलं इंग्रजी चा मास्तर नी त्याच्या वर्गातल्या छायडीला बोलून घेतलं अन काहीतरी बोलून त्यांच्या सोबत आलेल्या पोरीला तिच्यासोबत पाठून दिलं. संत्याच्या डोक्यात चटकन उजेड पडला अन किश्या दबक्या आवाजातच म्हणाल, लका वर्गात कोणतरी नवीन आलंय.
वर्गात पोरांची लाईन गेली, संत्याची नजर तिलाच शोधत व्हती. ती काय त्याला दिसत नव्हती सगळ्या पोरींनी तील गराडा घातला व्हता. ती इंग्रजी च्या मास्तरांची पोरगी व्हती इतकच संतांच्या कानावर आलं व्हतं. पहिली घंटा झाली मराठीचे मास्तर वर्गावर आले, हजेरी घ्यायला रजिस्टर घेतलं, कांचन तीच नाव. मास्तरांनी सांगितलं आपल्या नवीन आलेल्या इंग्रजी च्या गुरुजींची ही मुलगी कांचन. मास्तर शिकवू लागले, पण आज का कुणास ठाऊक संत्याच्या डोसक्यात काहीच घुसत नव्हतं. दोन चार तास असंच निघून गेले. पाचवा तास व्हता कदाचित त्यो, इंग्रजी चे मास्तर वर्गावर आले. पोरांना फुल टेन्शन आलेलं. धावी च्या पोरांला नीट पुस्तकातलं वाचता बी येत नव्हतं. मास्तर वर्गात आल्यावर पोरांनी “एक साथ नमस्कार” घातला. मास्तर नि त्याच येळी पोरांना खडसावून सांगितलं इथून पुढं “गुड मॉर्निंग सर” म्हणायचं. पोरांना जरा अंदाज आला मास्तर जरा कडकच दिसतोय. नेमकं इंग्रजी च्या तासाला कांचन अन संत्याची नजरेला नजर झाली.
मास्तर यु- यु स्टँड उप अरे तूच रे उठ अन पेज नंबर वीस वरचा धडा वाचायला सुरुवात कर. संत्याला पाक घाम आला. पाहिलं तर विसाव पानच लवकर गावना गावलं तर वाचाया कुठं काय येतंय? संत्या मनातच म्हणत व्हता मायाला ह्या मास्तर ला बी मीच गावया पाहिजे व्हतो का? मास्तर नि संत्याला चांगलंच झपाल अन उद्या येताना ह्यो धडा नीट वाचून यायला सांगितला.
असेच दिसामागून दिस जात व्हते, संत्या आता कांची कड जास्तच बघत व्हता. किश्याला कुठं तरी पाणी मुरताय याचा अंदाज आला व्हता. एक दोन बऱ्या किश्या नि इचरल बी संत्याला पण तसं काय नाय म्हणून त्यानी सांगितलं.
आज त्यो दिस उजाडला व्हता, तिला सांगायच्या आधी आज संत्या किश्याला सगळं सांगणार व्हता. नेमका दिस आठवत नाय पण शाळा सुरू व्हवून दोन अडीच महिन झाली व्हती. रयवार व्हता, किश्या अन संत्या पाटलाच्या पडकात जनावर चरायला घेऊन गेले व्हते, बाकीचे पोर बी लांबून लांबून जनावर हाकत व्हते, संत्यानी सांगितलं लका किश्या मला कांची लई आवडती. किश्यानी पहिली पाठीत एक बुक्की घातली अन मग गळ्यात हात टाकून सगळं रचाराय लागला. संत्याला त्या बुक्कीच काहीच वाटलं नाय, संत्यानी बी सगळं सांगून टाकलं. संत्याला त्या दिशी मोकळं मोकळं वाटत व्हतं.
सोम्मारच दिस शाळेत जायचं म्हणून संत्या उरकत व्हता तेवढ्यात किश्या आला अन म्हणाला लका अजून उरकलं नाय व्हय? कमीत कमी आज तरी लवकर उरकायच की, आज रक्षाबंधन हाय. संत्याच्या मनात धस्स झालं. आज शाळेत जायचं नाय अस मनात पक्क ठरवलं. पण घरी रयला काहीच कारण नव्हतं. अन एक तर किश्यच भजन चालुच व्हतं उरक लवकर- उरक लवकर. किश्याच्या हातात डजभर राख्या व्हात्या. कस बस संत्यानी आवरलं अन शाळेला निघाले. शाळेत नग जायला अस संत्या सारखा किश्याला म्हणत व्हता. पण किश्या काहीच ऐकत नव्हता. तू जर शाळत आला नाहीस तर आप्पाला सांगतो बघ. संत्याला आप्पाच्या मरापेक्षा शाळा बरी वाटली. शाळेत गेल्यावर प्रार्थना झाली पोरं वर्गात गेली. पहिल्याच तासावर इंग्रजी चे मास्तर आले होते, बऱ्याच पोरांनी घसकच घेतला व्हता आज. फकिस्त कुणी राखी नग बांधाया म्हणून पोरं शाळातच आले नव्हते. किश्या मात्र खुश व्हता त्याचा हात पाक गच भरला व्हता. संत्या ला म्हणत व्हता व्हय र लका इतक्या पोरींच रक्षण करणार हाय व्हय तू. तव्हा किश्या त्याला भारताच्या प्रतिज्ञेची आठवण करून देत व्हता. आज वर्गात हजेरी झाली अन मास्तर शिकवण्यावजी काहीतरी वेगळाच करू लागले. एक कागदाचा बॉक्स घेऊन यायला कुणालातरी सांगितलं अन पोरींना त्यांच्या नावाची एक एक चिट्टी कराया सांगितली. हे सगळं काय व्हतंय कुणाला काय काळना. बॉक्स घेऊन येणार पोर बी चाट दिशी आलं. मास्तरांनी सगळ्या पोरींना त्या बॉक्स मधी त्यांच्या त्यांच्या नावाच्या चट्ट्या टाकाया लावल्या, सांत्या च्या डोक्यात आता उजेड पडला. आज आपलं “रक्षाबंधन” व्हनार हाय. आता वाटत व्हतं भेंडी बापाचा मारच बरा व्हता. दोन चार शिव्या किश्याला बी दिल्या. सगळ्याच पोरांना घाम सुटला व्हता. मस्तराला पोरं काहीबाही बोलत व्हते पण उभं राहून आम्ही राखी बांधणार नाय बोलायची कुणाचीच हिम्मत व्हतं नव्हती. तश्या पोरी बी जरा घाबरल्याच होत्या. मास्तर मात्र प्लॅन करूनच आले व्हते.
अश्या प्रकारे रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झाला. वर्गात पोरी कमी व्हत्या म्हणून प्रत्येक पोरीला दोन पोराला राखी बांधाव लागणार व्हती. मास्तर नि एक एक पोराला पुढं बोलून घेतलं, सगळे पोर देवाला विनंती करीत व्हते कुणाचं बी नाव येवुदी फकिस्त तीच नग यया. कार्यक्रम सुरू व्हता एक एक पोर पुढं जाऊन चिट्टी काढीत व्हतं अन ज्या पोरीचं नाव घेत व्हतं ती पोरगी त्या पोराला येऊन राखी बांधत व्हती. अर्ध्या पोरांची अन सगळ्या पोरीची एक एक वेळा राखी बांधून झाली व्हती. हा कार्यक्रम सुरू असताना हळूच संत्या पाक मागच्या बेंच वर जाणून बसला तसा किश्या पण त्याच्या सोबत माघ आला. एक एक पोरगी अन पोरं कमी कमी व्हतं व्हते. तसा संत्या रडकुंडीला यायला लागला. देवाच नाव घेऊ लागला. नुसता घाम अन अंग थरथरत व्हतं. किश्या मात्र खुश व्हता. त्याला याच काहीच वाटत नव्हतं. संत्या मात्र आता म्हसोबा ला बी नवस करीत व्हता कुणबी येवुदी पण कांची नग...
शेवटच्या दोन चिठ्या त्यात एक कांची अन तिची एक मैत्रीण अन तिकडं ते दोघ संत्या अन त्याचा मित्र किश्या. संत्या किश्याला म्हणत व्हता लका म्हव नशीब आज लईच खराब हाय पहिलं तूच जा अन चिट्टी उचल. मास्तरांनी जसा आवाज दिला किशोर या समोर, संत्याची धडधड वाढली. त्याला फकिस्त किडनीत अटॅक यायचा बाकी व्हता. आता बाकी सगळं त्यांनी म्हसोबा च्या हाती सोडलं व्हतं. किश्यानी चिट्टी उचलली अन उघडली तसा जरा किश्या बी गारच पडला पण त्यानी कांचन च नाव घेतलं अन संत्याच्या जिवंत जीव आला तशी कांचन बी खुदकन हसली. पटकन उठून ती किश्याला राखी बांधून आली.आता संत्या डॉन सारखा ऐटीत पुढं गेला अन कांची च्या मैत्रिणी काढून राखी बांधून घेतली. आज चा कार्यक्रम संपला म्हणून मास्तरांनी सांगितलं. आज चा दिवस संत्यासाठी खूप चांगला आहे असं त्याला वाटत व्हतं, त्यो शाळा सुटल्या सुटल्या म्हसोबा च्या पाया पडाया जाणार व्हता. आज शाळेत कांची बी जरा खूषच दिसत व्हती. दिस चांगला गेला. शाळा सुटली संत्या घराकडं न जाता म्हसोबा ला निघाला तसा किश्या त्याला म्हणाला व्हय र संत्या आज तिकडं कुठ र? संत्या म्हणाला आज देवानी म्हव ऐकलं आज म्हसोबाच्या पाया पडून येतो. किश्याला काय कळना मग सगळा इतिहास संत्यानी किश्या ला सांगितला.
किश्या संत्यावर जोरदार हसाय लागला अन म्हणाला बेट्या म्हसोबा राहुदी आधी तू म्हया पाया पड. संत्याला काय बी कळना तसा पाहिलं मह्या पड मग सांगतो म्हणून किश्यानी संत्याला त्याच पाय पकडाया लावले. संत्या जरा गरमच झाला व्हता ही काय भानगड हाय काय? किश्या अजून बी मोठमोठ्यानी हसत व्हता. किश्या संगाय लागला, लका मला माहित हाय तुला कांची किती आवडती. तिला बी तू आवडतो हे आजच मला बी कळलं जव्हा त्या बॉक्स मधून चिट्टी काढायची व्हती तव्हा मी तिच्याकडं एकदा बघितलं व्हतं. ती बी असंच देवाला विनंत्या करीत व्हती. “मी चिट्टी जव्हा काढली तव्हा त्यात कांचीच नाव नव्हतंच”. त्यात नाव व्हतं कांचीच्या मैत्रिणीच पण मग इचार केला लका घोळ व्हइल म्हणून म्या कांचीच नाव घेतलं अन तुम्हाला दोघाला बी म्हसोबा पावला. आता खरच संत्या मनापासून किश्याच्या पाया पडाय लागला व्हता पण किश्यानी त्याला मिठी मारली. आज संत्यासाठी रक्षाबंधन नव्हतं तर मैत्रिदिन व्हता...

--erpblogs
Comments
Post a Comment