झुलवाकार
जवळजवळ ७ वर्षे झाली असतील या घटनेला आपण इतक्या मोठ्या माणसाच्या घरी आलो आहोत यांची जरा देखील जाणीव नव्हती मला. नाव “उत्तम बंडू तुपे",खडकी येथील घरी गेलो होतो मी.घर सापडायला जरा वेळ गेला कारण ते एका खोणपडात होत. घर तरी कसे म्हणावं एकच १०x१० ची खोली त्यातच स्वयंपाकासाठी असलेली एक चूल आणि पुस्तकाने भरून गेलेल्या भिंती. त्या खोलीत त्या माऊलीने बसायला टाकलं आणि चहा करायला टाकला पण तो देखील कोरा(दूध नसलेला) आणि विचारले देखील चाललं ना तुम्हांसनी मी होकारार्थी मान करून चाललाय की असा इशारा केला. चहा करण्यासाठी चूल पेटवत होती ती चूल, तो चहा मला काहीच समजत नव्हतं काय चाललंय ती आज्जी(कारण ती माझ्या आज्जी च्या वयाची असेल) तीला काय चूल काय लवकर पेटत नव्हती त्या खोलीत सगळा धूर झालेला तशातच एक छोटी पोरगी पळत पळत आली घसलेटाचे दोन-चार थेंब चिमणीतून ओतले आणि ती चूल पेटवून दिली त्या चुलीत अचानक जाळाचा भडका झाला आणि चहा उकळू लागला ती आज्जी त्यांच्या संसाराच्या गाड्याबद्दल सांगत होती, आणि अचानक त्या पुस्तकाकडे पाहत बोलली कधी कधी वाटत या पुस्तकाला पण या चुलीत टाकावं ”झुलवा" चे “झुलवाकार" दारातच बसून हे सर्व ऐकत होते थोड्या वेळात चहा उकळला आणि स्टील च्या कपात चहा ओतला. चहा पीत असताना मात्र आज्जी ने लेखकाचे मनसोक्त कौतुक केलं. मला या झुलवकाराचे काही नाटकात केलेल्या कामाचे फोटो पाहायला मिळाले, झुलवाकाराने लिहिलेलं प्रत्येक पुस्तक वाचायला नाही पण पाहायला मिळालं ती आज्जी त्यांच्या सर्व जुन्या आठवणींना उजाळा देत होती जगण्यासाठी केलेला सारा आटापिटा ती सांगत होती प्रत्येक फोटो मागची कहाणी सांगत होती, मी थोड्या संभ्रमात पडलो हा माणूस इतका मोठ्या कलाकारांसोबत काम करत होता मग आज असा का? या मागच्या अर्धा एक तासात मला जरा देखील कल्पना नव्हती की आपण इतक्या मोठ्या लेखकाच्या घरी आहोत. आणि ओळखणार तरी कसे ना मोठा बंगला ना दारात साधी दोन चाकी गाडी. एका मोडक्या खुर्चीत बसलेली ती छबी अजूनही जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर आहे, घरासाठी चाललेली धडपड मला त्यावेळी समजली नाही पण काही दिवसांपूर्वी टी. व्ही. वर बातमी वाचली आनंद झाला ‘उत्तम बंडू तुपे यांना मिळणार हक्काचे घर'. सर्व गोष्टी माणसाला तो माणूस या जगातून निघून गेल्यावरच कळतात आज हे सर्व लिहिण्याची वेळ माझ्यावर आली कारण मागचा रविवार दिनांक २६ एप्रिल २०२० रोजी या महान झुलवाकाराचे निधन झाले. आज मला लिखाणाची सवय झाली ती पण या आणि अश्याच खूप साऱ्या लेखकांमुळे माणूस जितकं वाचेल तितका प्रकट होऊ शकतो.
या अश्या महान ”झुलवाकाराला" भावपूर्ण श्रद्धांजली।
प्रविण
लेखनास सुरवात झाली हीच त्यांना शब्दरूपी श्रद्धांजली झाली ...
ReplyDeleteतुमचं लिखाण उत्तरोत्तर वाढत जावो ...👍👍
धन्यवाद सर...🙏
Deleteआता हे लिखाण असंच चालू राहील.