कोरोनातली नवरी
ह्याचा मुडधा बसविला, कुठून आला आहे काय माहीत? कडू कुठला. त्या कोर्टाच्या तारखे सारख्या तारखा पडत आहेत.बाई काय काय प्लान केले होते मी, म्हणल होत जरा फिरली असते टाईम घेतला असता आणि मग विचार केला असता,तर हा बाबा दारातच येवून बसला आहे. पुण्याला जायचं होतं लग्नाची खरेदी करण्यासाठी, काय काय घ्यायचं होत त्याची लिस्टच तयार करून ठेवली होती. मला तो अनुष्का ने तिच्या लग्नात डिझाइनर ड्रेस(सभ्यसाची लेहंगा) घातला होता ना तसाच घ्यायचा होता. त्यांना पण सांगितलं होतं तुम्ही पण विराट नी जसा ड्रेस घातला होता तसाच घ्या. तसं लग्नात घालण्यासाठी दोन चार डिझाइन चे गळ्यातले पाहिले होते पण घ्यायचे राहूनच गेले. हातावर खास अरेबिक डिझाइन ची मेहंदी काढणार होते. मेकअप साठी एका ब्युटीपार्लर वाल्या बाई ला पैसे पण दिले होते. गाजऱ्या वाल्या पोराला पण एक खास गजरा तयार करायला सांगितला होता.पायात नेमकी कोणत्या प्रकारची चप्पल घालायची यासाठी पूर्ण दिवस घातला होता, बाई त्यांच्या पेक्षा उंची थोडी कमीच होती म्हणून हिल वाली सैंडल घेऊ असा निर्णय घेतला होता. नखांना कोणत्या रंगाची नेलपेंट लावायची इथपासून सर्व बारीकसारीक विचार मी करून ठेवला होता. माझ्या या वयात मी कानाला आणि नाकाला धाव करून घेतलं होतं किती रडू आलं होतं मला. खूप राग आला आहे मला त्याचा, आमच्याच वेळी का?
माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या आबांनी पोरीचं लग्न म्हणून किती खटाटोप केलेला. इतक्या साऱ्या पत्रिका घरात येवून पडलेल्या. चार लॉकडाऊन, चार वेळा तारीख बदलली मी. आता मात्र बस झालं एवढी उजळणी तर मी शाळेत असताना पण नव्हती लिहिली. आबांनी कॅमेरावाला, कार्यालय, बँडवाले,आचारी सगळे बुक केलेले होते. आमच्या यांना तर घोड्यावरच वरात पाहिजे होती. त्यांच्या देखील मनाप्रमाणे केलं होतं. जवळपास सर्व तयारी झाली होती आणि हा बाबा अचानकच येऊन बसला.
शेवटी मीच निर्माण घेतला, आज माझं लग्न आहे. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन छान पैकी एक साडी घेतली. मंगळसूत्र घेण्यासाठी मला आवर्जुन घेऊन गेले. हातावर अरेबिक डिझाइन नाही पण माझ्याच मैत्रिणीनं मस्त मेहंदी काढली आहे. आई बोलली, बाई तुला मेकअप ची काय गरज आहे तू अशीच सुंदर दिसतीस मग तो पण विषय सोडून दिला. डोक्यात छान पैकी एक गुलाबाचं फुल कोणीतरी लावून गेलं. तेवढे कानाला आणि नाकाला धाव पडून ठेवलेले मात्र तसेच आहेत, होईल कधीतरी उपयोग. आमचे हे तर चक्क हिरो होंडा वरून आले होते. एका झाडाखाली चाळीस एक लोकांमध्ये आमचं लग्न होणार आहे. कसलीही धावपळ नाही, गोंधळ नाही,किलबिलाट नाही सर्व शांत पणे चालू आहे. माझ्या आई ला तिच्या लग्नची आठवण झाली, माझे आबा दूरच उभा होते पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू मला दिसत होते, आबा मला बोलले, बाळा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकलो नाही. पण आबा खरं सांगू मी पण त्याच समाजाचा भाग होते जो मला दाखवला गेला होता. आज मी खूप आनंदानी सासरी चालली आहे. तुम्ही माझी काळजी करू नका.“येते".
थँक्स कोरोना.
Comments
Post a Comment