*फोटो*
काय राव विसरला वाटतं आम्हाला, असं कुठं असतंय व्हय. आम्ही नाही बाबा विसरलो कुणालाही,आणि विसरणार तरी कसे ना आम्ही म्हणजे आठवण असतो बाबा सर्वांची.अन तीच जर पुसली तर मग कस होणार ना म्हणून आम्हाला सर्व आठवत आणि विसरूनही चालत नाही. कसले भारी दिवस होते ना आमचे पण मस्त पैकी मोठ्या कॅमेरा मध्ये रीळ म्हणून बसायची मज्जा काही औरच होती. मग त्या रीळ ला निगेटिव्ह म्हणायचे आणि ह्या निगेटिव्ह मधून आम्ही बाहेर पडायचो. मात्र आता या मोबाईल मध्ये आम्हाला बंद करून ठेवल आहे. कधी कधी त्या मोबाईल मध्ये इतका दम कोंडतो ना असा वाटत मारतोय की काय, त्यांनी दिले आहे कॅमेरा चे फिचर मग काय किती पण काढणार का? बाबा रे बाबा कसले कसले फोटो काढता तुम्ही वाकडे,तिकडे,साईड व्हीव,टॉप व्हीव,आणि काही काही चे तर आम्हाला नाव पण माहीत नाहीत. कधी कधी तर अस वाटतं तुम्ही फिरायला गेल्यावर डोळ्यांनी कमी पाहता आणि फोटोच जास्त काढता.
काय तो आमचा काळ होतो आमच्यासाठी स्टुडिओ बनवला जायचा. मला की नाही त्या चार-पाच पोरी अंतिम वर्षाला असताना नटून फोटो काढायला यायच्या ना ते खूप आवडायचं. त्या आठवणी अजूनही तशाच ताज्या आहेत. दोन दिवसापूर्वी च नमी माझ्याकडे पाहून ढसाढसा रडली बिचारी. मला अजूनही आठवतंय १९९६ ची तिची बारावीची बॅच होती. राव जाम आवडायची आपल्याला ती.एका क्षणात प्रेम होणे काय असत ना ते मी तिला पाहिल्यावर कळलं होतं. ती आणि तिच्या चार मैत्रिणी आल्या होत्या फोटो काढायला. १२वी नंतर ती जास्त माझ्या कडे फिरकली नाही एकदाच आली होती फुल साईझ फोटो काढायला, समोरच्या मुलाला द्यायचा होता. मला जरा जरा अंदाज आला होता आणि ती चटकन बोलून गेली लग्न ठरलं आहे माझं. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारा मी, आज माझ्याच डोळ्यात अश्रू आले होते. थोड्या वेळानी ती बोलली लग्नात फोटो काढण्यासाठी साठी तूच यायचं. मी पटकन डोळे पुसले आणि ठरवलं आता रडायचं नाही माझ्या नमीचे फोटो असले भारी काढणार ना पाहणाऱ्याने नुस्ते पाहताच राहिले पाहिजे. लग्नाच्या दिवशी मी नमी ला डोळे भरून पाहिले तिचा प्रत्येक सुखाचा क्षण मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. मला माझी लायकी समजली होती कोणावरही जीव लावायचा नाही. पण का कुणास ठाऊक माझी नमी माझ्यावर अजूनही प्रेम करती की काय? कधी कधी ती हेच फोटो पाहते, हसते,आनंदी होती मग मला खूप बरं वाटत.
खूप साऱ्या लोकांनाच्या आठवणी आहे मी. काही लोक मला हातात घेऊन रडतात, त्यांच्या जुन्या आठवणीत गुंग होऊन जातात. सर्वात जास्त मज्जा ना त्या प्रेमी युगुलांची येते कुठे कुठे लपवून ठेवता मला. धड इंग्रजी चा इ येत नाही आणि त्या पुस्तकात मला ठेवलेलं. मला पाहतात आणि आनंदी होतात. नवरा नवरीला लग्नात काय काय गोष्टी घडल्या ते मी सविस्तरपणे सांगतो. एका सैनिकांची पत्नी माझ्याकडे तासंतास पाहत होती तिकडे तिचाच पती पॉकेट मधून मला हळूच पाहून परत पॉकेट ठेवून देत होता, एका बापाची आपल्या मुलाला नौकरी लागली म्हणून माझ्याकडे पाहून छाती फुलली होती, एक मुलगा माझ्याकडे पाहून आई बापाच्या आठवणीत दूर कुठेतरी गेला होता. एक चिमुकली माझ्या कडे पाहून आजी-आजी आवाज देत होती. कधी जर तुम्हाला तुमची पंजी,खापर-पंजी,काळ तोंड,निळं तोंड पहायचे असतील तर मला फक्त एक आवाज द्या.
आज मला तुम्ही कॉम्प्युटर, मोबाईल सारख्या डब्ब्यात कोंडून ठेवलं आहे,माझी तक्रार मुळीच नाही असुदे काळानुसार बदललं सर्व पण मला आठवण येते,मला संवेदना आहेत, मला पण रडू येत,मी नाही विसरू शकत काहीही. जास्त काही नको तुम्ही माझ्यासाठी एक गोष्ट कराल मला त्या आठवणीत घेऊन जा. तो डब्बा कधीतरी उगढून मला माझं जग परत परत दाखवा.
आणि हो नमे तू माझ्यावर प्रेम करतेस मला कळलं आहे असाच प्रेम करत राहा, तुझाच एक “फोटो".

Comments
Post a Comment