तिकडचा आत्मा




काऊन नको आहे बे तुम्हाला ही जिंदगी? जिथं हाये तिथं गप जगा ना इकडं पहिलेच लै कचरा झालेला हाई. आता तुम्ही म्हनतान हे कोण अन कुठून बोलताय? हाव हाव मी आबा होई आबा अन मी इकडून लांबून बोलत हाय. आम्ही श्यान खाल्लं अन इथं आलो. आता जरा माघ जाऊन सांगतो, मी बी तुमच्यातलाच एक व्हतो. दिसभर काम करून जीवाला चार घास खात बी व्हतो, एक वरीस पाऊस कमीच झाला. सावकाराकडनं पाच पन्नास हजार रुपय कर्ज घेतल अन म्हवा यिषय संपला. ते टेन्शन का काय म्हणत्यात ते मला आलं. पण ते काय असतं ते काय मला समाजल नाही बघा. अन मंग काय जे सगळेच करत्यात तेच म्या बी केलं “आत्महत्या". म्हणलं व्हत तिथून सुटणं अन ते टेन्शन जाईन पण कसलं काय? ते अजूनच वाढलं पण आता इथं अजून एक बऱ्या आत्महत्या करायचा इचार बी करू शकत नाही बघा. त्यो ऑप्शन नाही बघा इकडं. खरं सांगू तर म्या चुकीच्या इभागात आलो हाय. तुमच्या इकडं कसं येगयेगळे इभाग असतेत पुलीस इभाग, तहसील इभाग तस इथं बी इभाग हाईत शूर मरण आलेला इभाग,म्हातार व्हावून मरण आलेला इभाग, अपघातात मरण आलेला इभाग आणि आमचा आत्महत्या वाला इभाग. आमच्या इभागाला ना बाकीचे लोकं खालचं समाजतेत,आम्ही पळपुटे,भित्रे हाईत असं म्हणतेत. म्हणाल व्हत एकदाच मेलो म्हंजी संपलं सगळं पण नाही बघा तस काही बी नसतंय राहिलेलं आयुष इथं काढावंच लागतंय. आमच्या इथं सगळ्यात रुबाबात जगणारा म्हंजी त्यो आर्मी वाला. त्याला इर मरण आलं हाय जणू लढताना. त्यो इथला राजा हाय राजा त्याला सगळं लोक वाकून नमस्कार करतेत. सगळ्यात सुंदर अन सुखी जीवन हाय ते म्हातारे व्हावून आलेल्याच चार आठ दिस रातेत अन कोणाच्या तरी पोटी नवा जनम घेतेत. बरं आमच्या इभागात काय फकिस्त आमच्या सारखेच न्हाईत, चारच दिसापुरी नऊ-धा वरीस च पोरं इथं आलं, का तर बा नी काशीलात लावली, त्यो मोबाईल लै खेळतोय म्हणून. असच एक मागल्या वरीस बी आलं होतं धावीला नापास व्हाईन म्हणून, पण पास झाल चांगलं सत्तर टक्क्यानी मंग म्हणत व्हत मला परत जायचं हाई, आज काल इथं ते नईन परकारचे लोक येत हाईत ते पेरमात पडणार.आता ह्या इभागात नुस्ता कचरा झाला हाय लै गर्दी झाली हाई.ती मुंबई पुण्यात कशी गर्दी झाली हायी शेम तशी इथं बी झाली हाय.म्या चूक केली पण बाबानू तुम्हांसनी इथं येवुन चांगल अभिमानान जगायचं असणं तर तिथं इर मरण येवुन, म्हातारे व्हावून या. व्हय म्या चूक केली व्हती माह्या बा ची चार एकर जमीन व्हती इकली असती दोन एकर अन दिल असत पैस त्या बा चं दोन एकरात केला असता बायकू अन पोरा सोबत सुखाचा संसार पण मला असा सांगणारा कोण नव्हता वाटलं व्हत तिथून संपलो म्हंजी सगळं संपलं पण नाही बाबांनो तसं काही नाही इथं त्याच्याऊन बी बेकार हाय. मरण ह्यो उपाय नाय म्हंजे अजिबात नाय. आता इथून कधी सुटका देव जाणे.
- वरील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे याचा कुठल्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणाशीही संबंध नाही.

Comments

Popular posts from this blog

परत एकदा धोकेबाज मीच..!!!

धोकेबाज मी...!!!