बजावो रे...!!!

आज टिकली जरा नाराज दिसत होती तेवढ्यात तिथं सुरसुरी आली आणि विचारलं का गं बया काय म्हणून एवढी नाराज हायीस ? टिकली आपलं बराच वेळ काही नाही काही नाही म्हणून बोलत होती पण सुरसुरी आता खोलात गेली तेंव्हा कळलं टिकली नाराज असण्याचं कारण "बाई तुमचं बरं हाई तुमची आठवण होती तरी वर्षभरातून दोन चार बऱ्या नाहीतर आम्ही हि दिवाळी कि डायरेक्ट पुढची दिवाळी म्हणून मी जरा नाराज हाई बघ" हे दोघीच संभाषण सुरु होत तेवढ्यात तिथं गण्या आला आणि एक मोठा सुतळी बॉम्ब वाजवून गेला अक्षरशः दोघीही बहिऱ्या झाल्या. अचानक झालेल्या आवाजाने छातीत धडधड वाढली होती आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं आणि ऐकू देखील येत नव्हतं.

जवळपास दहा मिनिटानंतर सुरसुरीला तरी अंधुक दिसायला लागलं पण टिकली ला मात्र अजूनही काही सुचत नव्हतं कस बस टिकलीला सुरसूरीने हलवून शुद्दीवर आणलं. तेंव्हा टिकली बोलू लागली बघ बाई हे असलं आपलं जिणं काय अर्थ हाय का याला ?
गण्या अजून एक सुतळी बॉम्ब घेऊन आला इकडे यांच्या अंगाचा नुसता थरकाप सुटला. आत्ता तर कुठं जरा बरं वाटायला लागलं होत तेवढ्यात हो बाबा अजून एक बॉम्ब घेऊन आला. गाण्याचा बाप दारात येऊनच थांबला होता लांबूनच ओरडला "लका जरा तिकडं लांब वाजिव कि कानातून रघात यायचं बाकी ठेवलं हाईस". तेंव्हा कुठं गण्या चाचपडत जरा दूर गेला आणि केला अजून एक आवाज. गाण्याचा हा खेळ चालूच होता पण एक सुतळी बॉम्ब फुसका निघाला आणि गाण्यानी चांगल्या दोन चार शिव्या हासडल्या. फुसका निघालेला बॉम्ब गाण्यांनी फेकून दिला आणि तो पडला या दोघीजवळ. या दोघीची चर्चा जोरात चालू होती कसलं भारी ना त्या बॉम्ब च मोठा आवाज होतो सगळे लोक त्यांच्यावरच प्रेम करतात हे सर्व तो फुसका बॉम्ब दुरूनच ऐकात होता आता त्याला राहवलं नाही आणि त्याने सुद्धा या संभाषणात उडी घेतली टिकलीला मध्येच थांबवून "तुला माहित आहे का आमच्या अंगाची कसली लाही लाही होती, काही प्रेम ब्रिम नाही नुसत्या आवाजासाठी आमचा वापर आणि अजून एक सांगतो हे लोक आता मी फुसका निघालो म्हणून सोडून नाही देणार बघ आता तू थोड्या वेळानी गण्या येणार माझ्यातली दारू एका कागदावर काढणार आणि करणार मोठा भडका आणि नुसता धूर पार शेवटापर्यंत हाल करतेय राव हे लोक". सर्वच जण आपापलं दुःख सांगत होत तेवढ्यात तिथं अप्पाचा नातू एक बंदूक आणि रीळ घेऊन आला गाण्यावर बंदूक रोखून धडाधड एका मागून एक बंदुकीच ट्रिग्गर दाबत सुटला बंदुकीतून ठोय ठोय आवाज आणि धूर सोबतच निघत होता. संपलेल्या रिळाचे तुकडे बाहेर काढून परत नवीन रीळ टाकत होता. पडलेल्या रीळ च्या तुकड्यात बोलण्याइतकी शक्ती पण राहिली नव्हती तो बिचारा सर्वांचं फक्त ऐकत होता. चिंगी एका हातात सुरसुरी आणि दुसऱ्या हातात एक पावसाचं झाड घेऊन आलेली यांच्या जवळच झाड पेटवलं आणि उड्या मारू लागली त्या पावसाचे चार पाच थेंब टिकलीच्या अंगावर पडले आणि तिने एक छोटा आवाज करत प्राण सोडला. सर्वाना गहिवरून आलं पण हे सर्वांच्याच नशिबी होत हे माहित होत. पाराच्या जवळ चौथीचा बंड्या चांगला भडकेला दिसला बापानी लक्ष्मी फटका वाजवला दिला नव्हता. टिकल्याची डब्बी दोन दगडाच्या मध्ये ठेवून एक मोठा दगड त्याच्यावर घालण्याच्या तयारीत होता आणि म्हणत होता लक्ष्मी फटक्याहून मोठा आवाज करतो कि नाही बघाच आणि दगड घातला तसा मोठा आवाज झाला. त्यातल्या काही टिकल्या भलत्या खुश होत्या कारण त्या वाचल्या होत्या. ह्या भावानी सगळा बापावरचा राग त्या टिकल्यावर काढला होता.
आबाच पोरगं स्वतःला मोठं शहाणं समजत होत कोंबडा छाप हातात घेऊन उंच हवेत फेकत आवाज करत होता मग काय कोंबडा तो कोंबडा, आला राग आणि केला आबाच्या पोराच्या हातातच आवाज. पोरने सरळ जाऊन कोपरा धरला आणि चकली खायला मागितली. "मी म्हणतो काय गरज असले उद्योग करायची" गाण्याचा बॉम्ब दुरूनच बोलला.
गाण्याचे बॉम्ब फोडून झाले होते आता वेळ आली आहे हे भुईचक्कर ला समजलं. गण्या पळत आला आणि त्याने भुईचक्र बाहेर काढलं पेटवून दिल तसं शून्य मिनिटात त्या भूचक्राचं डोकं गरगरायला लागलं बिचार कधी ढगात गेलं कळलं सुद्धा नाही. जाळ आणि धूर संगटच म्हणतेय ना त्यो हा असा. बराच वेळ झालं शिऱ्या रॉकेट च्या माग लागलेला पण त्याला काही ते सरळ वर जात नव्हतं कुठं तरी वाकडंच जात होत. तिकडून पाटील येतच होते आणि ह्यानी रॉकेटला काडी लावली शेवटी ते रॉकेट, घुसलं धोतरात पाटलाच्या मग काय सगळीकडं हशा पाटील धम टाकून विचारत होता कोणी पेटवलं हे राकीट पण पोर कोणाची नाव घेत नव्हते.
बंड्या ची बहीण शांता कसली तरी बारीक डब्बी घेऊन आली तसे सगळे पोर जमा झाली. पारावर तिने डब्बीतून एक काळी गोळी काढली आणि पेटवली तसा नुसता काळा धूर आणि काळा पदार्थ बाहेर आला बंड्या त्याला पाहून साप साप म्हणून ओरडत होता आणि गळ्यात घालून फिरू लागला शेवटी तो साप पण वाऱ्यांनी उडत सुरसुरीच्या संभाषणात सहभागी झाला. “मायला यांच्या खरा साप पहिला तर पाय लावून पळतेत आणि आज मला गळ्यात घालून फिरतोय लका मला". कसला काळा केला आहे राव मला यांना कोणीतरी सांगा राव आता त्या धुरानी लई खोकला येतोय. सर्वांनाच आता हे जीवन नको नको झालं होत पण पर्याय नव्हता हे देखील ठाऊक होत. सर्वच जणं उदास मनानेका होईना दिवाळीच्या शुभेच्छा देत होते. चकल्या आणि शेव तळ्याचा वास येत होता पोर मध्येच घरात जाऊन फराळाच्या पदार्थावर ताव मारून येत होती. आता पाराजवळ बरीच गर्दी जमा झाली होती आणि दिवाळीच्या शुभेच्छा लोक एकमेकांना देत होते तसे इकडे फुसका बॉम्ब आणि सुरसुरी सुद्धा एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत होती टिकलीचा जीव गेलेला असताना सुद्धा.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

परत एकदा धोकेबाज मीच..!!!

धोकेबाज मी...!!!