जगा आणि जगू द्या हवं तसं...!!!
आत्महत्या हा आत्महत्या करणाऱ्याचा अयशस्वी पण चुकून यशस्वी झालेला प्रयत्न असतो.
जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी आपण मारून जावं असं नक्की वाटलेलं असतं मग आपण मरतो का लगेच तर नाही. आईचा मार खाल्ला, शिक्षकांनी सर्वांसमोर झापलं, परीक्षेत अपयश आलं असे अनेक कारणं आहेत मरण्यासाठी. एकाद्या व्यक्तीचा राग आला तर “मर तिकडं जाऊन" हे निघालेले शब्द खूप मनावर आपण घेत नाही पण काही घटना माणसाला निःशब्द करतात. मानव पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. पण तो खरचं आहे का? आपण आपल्या माणसाला जपत नाही असच आजच्या काळात दिसत आहे. काही घटना घडतात तेंव्हा वाटत कदाचीत ती वेळ चुकवता देखील आली असती. खूप लोक नैराश्यात जात आहेत, तेवढेच त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न पण करत आहेत. ह्या प्रयत्नांना गरज आहे कुटुंबातील व्यक्तीची. नैराश्यात गेलेल्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. ती व्यक्ती वेडा आहे असं कधीही भासवू नका, कारण त्याच पुढील पाऊलं काय असू शकते हे मागील काही काळात आपण पाहिलं आहे.
नैराश्य येण्याची खूप कारणं असू शकतात, आपलं पुढे काय होईल? एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे होणारे नुकसान वाढतच चाललं असेल किंवा कामाच्या ठिकाणी दबाव सहन न झाल्यामुळे नैराश्य येऊ शकत. अश्या वेळी गरज आहे ती आपल्या माणसांची प्रत्येक वेळी डॉक्टरच हवा असं काही नाही त्याला गोळ्या औषध पाहीजेतच असं देखील काही नाही गरज आहे ती फक्त दोन शब्द प्रेमाने आणि दिलासादायक बोलण्याची. नेहमी त्या व्यक्तीसोबत राहण्याची.
नैराश्य हे अचानक येण्याची गोष्ट नाही, माणूस कधीही हे टोकाचं पाऊल उचलण्याआधी किमान शंभर वेळा विचार करत असेल. याच काळात त्याला आपल्या माणसानं समजावून घेतलं तर ती वेळ टाळता येऊ शकते. प्रत्येक कुटुंबात कुटुंब प्रमुखाला समजावून घेतलं पाहिजे. त्याच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाला सांभाळून घ्यायला हवं. कुटुंबप्रमुखाची ती धुरा सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही.
आत्महत्या ही काही शेतकऱ्यांची किंवा व्यावसायिकाची नसते ती असते एका माणसाची. त्यामुळे कुटुंब उद्धवस्त होतात. गेंड्याची कातडी सर्वांनाच माहिती आहे, जोपर्यंत त्या नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या अंगावर ती गेंड्याची कातडी चढत नाही तोपर्यंत त्याला मोकळं सोडू नका. त्याला कणखर बनवा असे लोक खूप हळवे असतात.
आता सामान्य किंवा नैराश्यात जात असलेल्या लोकांसाठी का इतका विचार करता ? आपण फक्त एकमेकांसोबत जोडले गेलेलो आहोत, जा ना सर्व सोडून कुठेतरी दूर कुठेतरी एकांतात. माणसानं जगावं आपल्याला हवं तसं. आपण केलेल्या कार्याला जगातील लोक नेहमी नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे पाहत असतात. आपण कुठेतरी नैराश्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे आपल्याला कळत असत मग अश्या वेळी सर्व सोडून स्वतःला वेळ देणं गरजेचं आहे.
आज माझी लेखणी परत याच विषयाकडे वळाली त्याला कारणही तसंच आहे. शेतकरी किंवा शेतात काम करायला मुलगा नको म्हणतो कारण त्यांचा दिवसेंदिवस वाढत असेलला कर्जाचा डोंगर आणि पुढे चालून केलेली आत्महत्या. मग असाच विचार आता सामाजिक कार्य करताना करायला हवा का? हा प्रश्न निर्माण झाला आहे, तरुण पिढीने या कार्यात यावं का ? का त्यांना देखील अश्याच गरज नसलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
मित्रांनो एकचं सांगणं आहे, आपलं आयुष्य आहे जगा ना हवं तसं कशाला घ्यायचंय कुणाचा ताण.
“तुम्ही जगा दुसऱ्याला ही जगू द्या”
प्रविण सानप
Comments
Post a Comment