पुढे शाळा आहे...!!!
“सावधान" पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालावा. विसरलात वाटत हे वाक्य, काय सुसाट गाड्या पळवत आहात तुम्ही. सर्वप्रथम तर माफी मागते या परिस्थितीला मी सुद्धा तितकीच जबाबदार आहे. आज वाटतं, नको तितकं शिकवलं आणि आज ही परिस्थिती आली. बेट्या तुला काय मी हा व्हारस तयार करायला एवढं शिकवलं होत का रे? आज तू चक्क माझंच दार बंद केलंस.
माझे लेकरं येत नाहीत माझ्याकडं, ते गुरुजी सुद्धा कधीतरीच चक्कर मारतात. दोन आठवड्यापूर्वी गुरुजी आले आणि एकदा दार उघडलं तर जरा कुठं मोकळा श्वास घेतला. त्यादिवशी गुरुजी जरा चिंतेत वाटत होते. म्हणून विचारावं म्हटलं नेमकं काय झालं? तर त्यांचे डोळे भरून आले. गुरुजींच्या खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्यासोबत मग त्या परत जाग्या करू लागले. गुरुजींचं हे शेवटचं वर्ष होत, ते सेवानिवृत्त होणार होते. पण त्यांना अशी सेवानिवृत्ती नको होती. सेवानिवृत्ती च्या कार्यक्रमला एकाद्या लहानग्यांच्या हाताने फुलं घेऊन निवृत्ती हवी होती. त्यांना त्या बाहेरच्या फळ्यावर “सेवानिवृत्ती समारंभ" हे शब्द हवे होते ते त्यांना सोनेरी अक्षरात लिहून ठेवायचे होते. काहीच दिवसात आता गुरुजी शाळेत दिसणार नव्हते. मग मला सुद्धा जरा भारूनच आलं. आज माझा आत्मा असलेला “फळा" ओस पडला आहे. त्यावर मागील आठ महिने झालं काहीही लिहिलं नाही.मला तर मध्ये वाटू लागलं आता हाच आपला शेवट,असेच जाणार आपण. त्या फळ्याची जागा आता जणू ऑनलाइन नी घेतली आहे. ज्याच्या त्याच्या हाती टच चा मोबाईल दिसत आहे. एक वेळा माझा मलाच खूप राग आला मीच यापैकी काही लोकांना घडवलं आणि हा मोबाईल चा शोध लागला पण आज त्यामुळेच हे लेकरं माझ्यापासून दूर चालले आहेत. ते लहानगे चिमूकले जेंव्हा इथून फिरताना पहाते तेंव्हा वाटत त्यांनी यावं जरा वेळ बसावं माझ्यापाशी पण त्यांच्या बापानी दिलेले काम त्यांना करावं लागतं आहे. आता त्यांना माझा विसर पडला आहे.
तुम्ही शाळेत प्रवेश घ्यावा म्हणून त्या गुरुजींनी काय काय नाही केलं आणि आज तेच पोरं त्यांना सोडून जात आहेत. गुरुजी सांगत होते आपल्या शाळेतला हुशार गणेश त्याच्या वडिलांसोबत या वर्षी कारखान्याला जाणार आहे त्यांनी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं. गणेश चे वडील म्हणाले शाळाच नाही मग काय करू इथं ठेवून? असेच शाळेतले आठ दहा पोरं जाणार आहेत जणू, ऐकून जरा दुःख झालं. बापू खूप खुश होता त्याची पोरगी सहा वर्षाची झाली होती या वर्षी तिला तो पहिलीच्या वर्गात घालणार होता,पोरीने मागच्या वर्षीच बापाकडून एक शाळेचं ड्रेस आणि दप्तर घेतलं होतं. बाहेर रस्त्यावर टाकलेला गतिरोधक आणि तो पुढे शाळा आहे.....वाला बोर्ड आता काढून टाका .
एकाच गोष्टीच जरा बरं वाटतं गावातले किती सारे पोरं मला भेटायला आली कॉरंटायिन सेंटर बनवलं होत म्हणून. तिथं सुद्धा तुम्ही लोक थांबायला तयार नव्हते. लहान असतांना शाळेत येण्यासाठी रडत असणारे पण आज दूर पळत आहेत.
मला आता भूक लागली आहे, तो शाळेत शिजवला जाणारा भात मला खायचा आहे. त्याचा शिजत असतांना येणारा वास मला घ्यायचा आहे. पुन्हा एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या मला तुम्हाला द्यायच्या आहेत. घोडचूक केल्यावर एका फटक्यात सरळ करणारे मास्तर आणि तितक्याच प्रेमाने वागवणाऱ्या बाईंना मला शाळेत बोलवायचं आहे.
मला विश्वास आहे मीच शिकवलेलं लेकरू यावर नक्की उपाय शोधून काढेल.माझ्या सहनशीलतेचा काही लोकांनी अंत पाहू नये. एवढं लक्षात ठेवा तुम्हाला मीच शिकवलं आहे. काही दिवसांनी हे दार उघडेल आणि मी असे अनेक लेकरं मी घडवणार आहे. गुरुजींना सुद्धा त्यांच्या गणेश ला परत बोलवायचं आहे.
गुरुजी तुम्ही आता डोळे पुसा, मला तर फक्त शाळा हे नाव दिलं आहे पण याचे खरे हृदय तुम्ही आहेत. तुम्ही घडवलेल्या गणेशला या आलेल्या परिस्थिती वर औषध नक्की सापडेल. मला सुद्धा तुमचा “सेवानिवृत्त" कार्यक्रम पाहायचा आहे.
तुमचीच नेहमीची शाळा...!!!
धन्यवाद बन्या🙏
ReplyDelete