धोकेबाज मी...!!!
झक मारली आणि चाकाचा शोध लागला. इथं आमचा विचार करतच नाही राव तुम्ही. नुस्ती वंगवता वढ एक्सलरेटर आणि पळव ऐशी च्या स्पीड नी. पार आता जीव गेला की राव माझा. नुसता खुळखुळा करून टाकला आहे. टाकतेत तीस च आणि पाळवतेत पन्नास च्या तेला इतकी. त्यो मेकॅनिकल इंजिनीअर सुद्धा डोक्याला हात लावून बसला असेल गडे. अरे नुसतं तेल टाकून काही होत नसतंय, कधी तरी सर्व्हिसिंग नावाची गोष्ट असतीय ती पण करत जावा. आणि माझं वजन किती तुमचं तीन-चार लोकांचं किती जरा तरी विचार करा की लका. स्पीड चा काटा मोडून जाईल एकाद्या दिवशी, त्यो काही सत्तर च्या खाली येत नाही गडे.
आता मी म्हातारी झाली आहे,आता लवकरच माझी काळजी नाही घेतली तर काही खरं नाही बघ. प्रेम नाही राव राहील आपलं पाहिल्या सारखं. रोज मला पुसून काढायचास आठवड्यात एकदा धुवून काढायचायस नाहीतर अत्ता पार वाट लावली आहेस. दोन चकवरच्या गाडीवर तुम्ही चार लोक बसता जरा तरी काही वाटूद्या, म्हणजे मी असं नाही म्हणत सहा चाकाच्या बस मध्ये फक्त सहाच लोकांनी बसलं पाहिजे पण पहा विचार करून. थकले बाबा मी आता खरच एकाद्या दिवशी कुठे तरी अचानक माझा प्राण नक्की जाणार आणि त्या दिवशी मी तुझ्या कडेवर बसणार. अरे बाबा प्रेम करत होतास ना माझ्यावर मग आता काय झालं. लका काल त्या तुझ्या मित्रानी सुज्या नि कसली पळवली राव मला. फक्त त्याचा मणका आणि माझे दोन्ही चाकं मोकळे व्हायचे बाकी होते. लेका अजून वेळ गेलेली नाही मी खरचं तुला धोका देईल पहिलाच सांगून ठेवतोय. गावात जी तुझी इज्जत आहे ती माझ्यामुळे आहे लक्षात ठेव. भावड्या तुझ्या बायकोच्या आधी मी तुझ्या आयुष्यात आलेली आहे. बस आता मला हे सहन नाही होत. लेका तू तर विना चवीची चालू केलीस मला आज. दोन वायर एकमेकांना जोडून पार वाटोळं केलास माझं. अजून एक सांगायचंच विसरले. गेल्या महिन्यात त्या शिऱ्या नि पेट्रोल ऐवजी घासलेट टाकून पळवली मला. पार दम लागेलाला मला मग मी तरी काय करणार नाही सहन झालं भडाभडा उलटी केली नुसता धूर सोडून,पुढच्या चौकात पोलिसांनी दोनशेची पावती केली, परत मलाच शिव्या दिल्या आजकाल नीट चालत नाही म्हणून.
मी पण आता उपोषणाला बसणार आहे, सरकार नि एक माणूस एकच गाडी घ्यायचा नियम करायला हवा बस आता लई झालं, म्हणजे तुझं प्रेम जरा वाढलं माझ्यावरच. लका तुम्हाला गाड्याची आवड म्हणून काय चार चार घेऊन फिरणार का? आमचा ज्यावेळी सापळा व्ह्यायला येतो तेंव्हा तर तुम्ही आम्हाला खाटकाला विकायला काढायल्या गत करता राव.
तुला आठवत कसं नाही रे ते कॉलेजमध्ये असताना माझ्यामुळे तु पोरींसोमोर ऐट मारायचा. त्यातलीच एक ही तुझी बायको ती सुद्धा मला विसरली. तो सिंहगड चा पायथा,ते बालगंधर्व च नाटक आणि बरेच कुठले कुठले सिनेमे यातलं तुला कसं काहीच आठवत नाही. बरं हे झालं सर्व आनंदातले क्षण पण त्या दिवशी तात्या ची तब्बेत अचानक रात्री खराब झाली कुठलाही रिक्षा मिळत नव्हता आणि तुला माझी आठवण झाली,त्या दिवशी तात्याला मध्ये टाकून आपण तीन लोक दवाखान्यात गेलो मला काहीच वाटलं नाही कारण मला तात्यांची काळजी लागली होती.
खरचं आता मी थकले आहे.मला विकू नको किंवा भंगारात देऊ नको. मी लोकांना पाहिलं आहे किलोवर विकतात राव. जश्या तुम्हाला भावना आहेत तश्याच आम्हाला पण आहेत. तुम्ही जेवढा जीव आमच्यावर लावला यापेक्षा जास्त आम्ही तुमच्यावर लावलेला असतो. मला कुठेतरी एक कोपरा मिळाला तरी चालेल जास्त काही नको. धोकेबाज होऊ नकोस, तुझीच आवडती....
अप्रतीम लेखन👌🏻. स्व्तःच्या दुचाकी विषयी नक्कीच विचार करायला लावणारा लेख.
ReplyDeleteधन्यवाद...🙏🙏
Deleteलय भारी हा... लय भारी....🤘🤘
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...🙏
Delete